निलंगा : लातूर-जहिराबाद महामार्गावरील तळीखेड पाटीजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना सोमवार दि. १७ मार्च रोजी दुपारी घडली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. दत्ता सुरेश कदम (३५ रा. सावरी ता. निलंगा) असे मयत युवकाचे नाव आहे.
निलंगा तालुक्यातील सावरी येथील दत्ता सुरेश कदम व दिगंबर सुरेश कदम हे दोन सख्खे भाऊ हैदराबाद येथे नोकरीस आहेत. सावरीला पंढरपूरची पालखी येत असल्याने ते गावी आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही भाऊ एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी निलंग्याला येत होते. मात्र, निलंगामार्गे औरादला जाणा-या भरधाव कारने लातूर-जहिराबाद महामार्गावरील तळीखेड पाटीजवळ खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोराची धडक दिली. यातील दुचाकीवरील दत्ता कदम यांचा जागीच मृत्यू झाला.
तर दिगंबर कदम यांचा पाय तुटल्याने ते गंभीर जखमी झाले. कारमधील अतुल सुर्यवंशी आणि रुक्मिणी साखरे हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथोमपचार करुन पुढील उपचारासाठी लातुरला पाठविण्यात आले. मयताचे निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांना देण्यात आले. अपघातप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सावरी येथील दत्ता कदम व दिगंबर कदम हे दोन सख्खे भाऊ हैद्राबाद येथे नोकरीला आहेत. गावात पालखी येणार असल्याने जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यासाठी दोघे गावी आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी ते निलंग्याकडे येत असताना कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात मोठा भाऊ दत्ता कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर लहान भाऊ दिगंबर कदम हा गंभीर जखमी झाला आहे.