सोलापूर : जुळे सोलापुरातील आश्रय सोसायटीत अज्ञात कारणावरून एका ज्येष्ठ नागरिकाने सातव्या मजल्यावरील बाल्कनीच्या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली.
मोहनभाई डोसाभाई भुआ (वय ८७, रा. आश्रय सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. महिनाभरापूर्वी त्यांच्या पत्नीनेही याच ठिकाणाहून उडी मारून आत्महत्या केली होती.
जुळे सोलापुरातील आश्रय सोसायटीच्या सातव्या मजल्यावर राहणारे मोहनभाई यांनी किचनच्या बाल्कनीच्या खिडकीतून जमिनीवर उडी मारली. खाली पडल्याने ते बेशुद्ध झाले होते. घटनेनंतर सोसायटीतील लोकांची गर्दी जमली होती. त्यांना नातेवाइकांनी उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची हालचाल होत नव्हती. सातव्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्यामुळे रक्तस्राव झाला होता. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. परंतु त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
या घटनेची विजापूर नाका पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस हवालदार ए. एम. गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.
एक महिनाभरापूर्वी मोहनभाई भुआ यांच्या पत्नीनेही घरातील किचनच्या ड्राय बाल्कनीच्या खिडकीतूनच खाली उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांनीही तेथूनच खाली उडी मारून आपले जीवन संपवल्याने चर्चेला उधाण आले होते.