नांदेड/मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काही राज्यांचे मुख्यमंत्रीही प्रचारात सहभागी झाले. पण या सा-यात जर कोणाची चर्चा होत असेल तर ती तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची. रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाच्या सीमेवरील जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडवला. शिवाय त्यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांना हैराण केले. मुंबईतही आदित्य ठाकरेंसाठी याच रेवंत रेड्डी यांचा रोड शो झाला होता. त्यांच्या हिंदी भाषणांना सीमेवरील जिल्ह्यात मोठा प्रतिसादही मिळाला. त्यामुळे राज्याच्या निवडणुकीत रेवंत रेड्डींची चर्चा सर्वात जास्त होत आहे.
भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे. रेड्डी यांनी केलेल्या टीकेमुळे चव्हाण दुखावले गेले. रेवंत रेड्डींकडून पक्ष निष्ठेचे धडे घेण्याची मला गरज नाही. आरएसएस, तेलुगू देसमला दगा देऊन ते काँगेसमध्ये आले आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले. रेवंत रेड्डी यांचा इतिहास नांदेडच्या जनतेला माहित आहे. मलाही तो माहित आहे. त्यामुळे त्यांनी मला निष्ठेचे धडे देण्याची गरज नाही. त्यांनीच तेलगू देसम आणि आरएसएसला दगा दिला, असंही ते म्हणाले.
रेवंत रेड्डी यांनी मुंबईतही आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात रोड शो केला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबईत तेलगू भाषिक मोठ्या प्रमाणात राहातात. शिवाय तेलंगणाच्या सीमेवरही तेलगू भाषिकांचा प्रभाव आहे. त्यामुळे रेवंत रेड्डी यांनी हा परिसर पिंजून काढला. एकंदरीत, त्यांनी या निवडणूकीत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले हे नक्कीच!