24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

पुणे : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी ४ जून रोजी होत असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये, शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव,शिरुर येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये तर मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रुम) सील निवडणूक निरीक्षक,निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. सकाळी ८ वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल.त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीची सुरूवात होईल.मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे याशिवाय व्हिडीओ कॅमेराद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे घोषित केली जाईल.

मावळ लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया ११६, पुणे लोकसभा ११२, बारामती-१२४ व शिरुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया ११२ टेबलद्वारे होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी एकूण ६५६ मतमोजणी सहायक, ६०० मतमोजणी पर्यवेक्षक आणि ६४० सूक्ष्म निरीक्षक असे एकूण १ हजार ८९६ मनुष्यबळ तर टपाली व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी ४७ मतमोजणी पर्यवेक्षक, ६९ मतमोजणी सहायक आणि ५८ सूक्ष्म निरीक्षक असे १७४ याप्रमाणे एकूण २ हजार ७० मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR