नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला या महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीनंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यात ३० मार्च रोजी झालेल्या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडीबद्दलचे बोलणे झाले आहे.
मोदी नागपूरहून परतल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा झाली. पंतप्रधानांनी विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह आणि संघटना सरचिटणीस बीएल संतोष यांच्याशी राज्यांच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी नड्डा आणि बीएल संतोष यांना या महिन्यातच भाजप अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण करण्यास सांगितले आहे.
भाजपने आतापर्यंत १३ राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी १९ राज्यांमध्ये निवडणुका पूर्ण कराव्या लागतात. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह उर्वरित बहुतेक राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नावे पुढील आठवड्यापर्यंत जाहीर केली जातील. म्हणजेच ५० टक्के राज्यांमधील निवडणुका पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडता येतील. सध्या केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.
२०१९ मध्ये जेपी नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले आणि जानेवारी २०२० मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला. आता ते केंद्रीय मंत्री झाले आहेत. त्यामुळे पक्षाला नवीन अध्यक्ष निवडायचा आहे.