नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत २०२५ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. याचवेळी त्यांनी देशातील मखाणा उत्पादनाला चालना देण्याबाबतही भाष्य केलं. यासाठी देशात मखाणा बोर्ड स्थापन करण्यात येईल अशी घोषणा केली.
दरम्यान, या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच त्यांनी गरीब, शेतकरी आणि महिलांवर सरकारचा भर असल्याचे सांगितले. तसेच यावेळी ग्रामीण भागातील रोजगारासह भाजीपाला आणि फळांसाठी मोठी योजना प्रस्तावित आहे अशी घोषणा केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, बिहारमध्ये मखाणा बोर्ड प्रस्तावित आहे. मखाणा मार्केटिंगसाठी बोर्डाची स्थापना केली जाईल. मखाणा शेतक-यांच्या हितासाठी हे केले जाणार आहे. त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठीही प्रयत्न केले जातील.
मखाणा हा पोषक तत्वांचा खजिना
मखाणाचे उत्पादन वाढल्याने कृषी क्षेत्रालाच अधिक फायदा होणार नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते फायदेशीर आहे. मखाणा हा पोषक तत्वांचा खजिना आहे. शिवाय हाडांसाठीही फायदेशीर आहे. याचे अनेक फायदे पुरुषांच्या आरोग्यावरही दिसून येतात.प्रथिने, आहारातील फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे असे अनेक घटक त्यात आढळतात. मखाणामध्ये कॅलरीजही खूप कमी असतात. म्हणून, आपण सहजपणे आपल्या आहाराचा भाग बनवू शकता. याशिवाय मखणामध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे भूक कमी होते. शिवाय हाडांसाठीही फायदेशीर आहे. याचे अनेक फायदे पुरुषांच्या आरोग्यावरही दिसून येतात.
मखाणा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे तो आहारातील एक अतिशय उत्तम पदार्थ मानला जाते. यामुळे अनेक आहार तज्ज्ञ देखील मखाणा खाण्याचा सल्ला देतात. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते, तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यास प्रोत्साहन मिळते. साधारणपणे बहुतेकजण मखाणा तुपात, तेलात किंवा बटरमध्ये तळून मीठ घालून खातात. पण मखाणापासून इतरही अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात.