परभणी : काळ झपाट्याने बदलत असताना पारंपरिक विद्याशाखांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून दरवर्षी अभ्यासक्रमात काळानुरूप दहा ते पंधरा टक्के बदल करीत रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करावा. सोबतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वीरीत्या राबविण्यासाठी शिक्षकांनी बहुशाखीय होणे काळाची गरज असल्याचे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रभावी अंमलबजावणीच्या संदर्भाने प्राध्यापकांसाठी शनिवार, दि.१३ रोजी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव होते. प्रमुख उपस्थितीत उच्च शिक्षण नांदेड विभागाचे सहसंचालक डॉ.किरणकुमार बोंदर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.सूर्यकांत जोगदंड, सदस्य डॉ.डी. एन.मोरे, सदस्य इंजि. नारायण चौधरी, सदस्य डॉ.सुरेखा भोसले, अधिष्ठाता डॉ.एम.के.पाटील, अधिष्ठाता डॉ.पराग खडके, परीक्षा मूल्यांकन विभागाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके, डॉ.नीना गोगटे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, सहसमन्वयक प्रा.शरद कदम आदी होते.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. चासकर म्हणाले, काळानुरूप परीक्षा पद्धतीत बदल करावे लागतील. विद्यार्थ्यांची आवड, गरज तसेच त्याची परिस्थिती बघून शिक्षकांनी अध्यापन करायचे आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते वृद्धिंगत करणे काळाची गरज आहे. या धोरणांनुसार विद्यार्थ्यांना इच्छेनुसार शिक्षण घ्यायची संधी उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून त्याच्या हाताला काम मिळेल. यानुसार शिक्षक ही एका विषयापुरते मर्यादित राहीले नाहीत त्यासाठी शिक्षकांनी बहुशाखीय होणे गरजेचे आहे असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. सहसंचालक डॉ. बोंदर म्हणाले, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतले आहे याचा अर्थ असा नाही की शिक्षकांचे अहित होईल. हे धोरण विद्यार्थीभिमुख असल्याने सरकारच्या वतीने तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. सदरील धोरण यशस्वी राबविण्याची जबाबदारी विद्यापीठ, महाविद्यालय आणि शिक्षक यांची आहे. सोबतच त्यांनी धोरणात शिक्षकांची भूमिका काय असली पाहिजे यावरही भाष्य केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.जाधव यांनी केला.
सदरील कार्यशाळेसाठी साधनव्यक्ती म्हणून डॉ.पराग खडके, डॉ.डी. एन. मोरे, डॉ.एम. के.पाटील यांनी विद्यार्थ्यांना विषय निडवताना येणा-या अडचणी, शिक्षकांच्या जबाबदा-या, क्रेडिटची मांडणी, उपलब्धता आदी विषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ.रोहिदास नितोंडे, सूत्रसंचालन डॉ.जयंत बोबडे तर आभार डॉ.उत्कर्ष किट्टेकर यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्यांनी पुढाकार घेतला.