31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeमहाराष्ट्रनक्षल-पोलिसांत चकमक; ३ नक्षली ठार

नक्षल-पोलिसांत चकमक; ३ नक्षली ठार

छत्तीसगड-महाराष्ट्राच्या सीमेवरील घटना

गडचिरोली : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती भागातून नक्षलवादी आणि पोलिसांत मोठी चकमक झाली असून दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात गोळ्या झाडण्यात आल्याने या चकमकीत ३ नक्षलवाद्यांना कंठस्रात घालण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती सीमाभागातील बिजापूर जिल्ह्यात ही मोठी चकमक झाली आहे. यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. यात ३ नक्षली ठार झाले आहेत.

या चकमकीनंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व स्फोटक पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांच्या डीआरजी, एसटीएफ कोब्रा अशा तीन बटालियनने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. महाराष्ट्राचा सीमावर्ती भागात असलेल्या इंद्रावती जंगल परिसरात ही चकमक झाली. इंद्रावती नॅशनल पार्क भागात अगोदरही मोठ्या संख्येत पोलिसांनी नक्षलवाद्यांना ठार केले होते. अजूनही त्या जंगल भागात कॉम्बिंग ऑपरेशन सुरूच आहे. त्यामुळे आगामी काळातही येथे आणखी काही नक्षलवाद्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्षलवाद्यांनी पेरले होते भूसुरुंग
गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी आणि पोलिसांतील संघर्ष वाढला आहे. छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ११ एप्रिल रोजी लावलेले तीन भुसुरंग स्फोटांचा पोलिसांनी शोध लावला होता. तीन दिवसांअगोदर नक्षलवादी संघटनेने पत्र काढून पहाडीवर मोठ्या प्रमाणात ईडी स्फोटक लावल्याची सूचना गावक-यांना दिली होती. याच स्फोटकांचा शोध अखेर कोब्रा बटालियन व छत्तीसगड पोलिसांनी लावला होता. ही सर्व स्फोटके नंतर पोलिसांनी निकामी केली होती. यातील २ भूसुरंग निकामी करताना पोलिसांनी तब्बल चार तास कसरत करावी लागली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR