24.5 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक

जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय

किश्तवाड : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील दाछान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा एक गट या भागात लपून बसल्याचा संशय आहे. माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे.

अधिका-यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे दाछान आणि नागसेनी दरम्यान असलेल्या खानकू जंगलात पोलिस आणि सैन्याने शोध मोहीम सुरू केली, तेव्हा ही चकमक सुरू झाली. शोध मोहीम सुरू होताच जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना पाहताच गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनीही कारवाई केली आणि गोळीबार केला. ही चकमक काही काळ चालली, मात्र यात कोणीही जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नाही. अधिका-यांच्या मते, या भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे आणि कारवाई अजूनही सुरूच आहे. सुरक्षा दल जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना घेराव घालून त्यांना पकडण्याचा किंवा निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुरक्षा दलांची कडक कारवाई
किश्तवाडमधील चकमकीच्या घटनेच्या एक दिवस आधी, शनिवारी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या काउंटर-इंटेलिजन्स शाखेने दहशतवादी निधी आणि भरती मॉड्यूलशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रकरणात मोठी कारवाई केली आणि श्रीनगर, पुलवामा, बडगाम आणि गंदरबल जिल्ह्यांमधून १० संशयितांना ताब्यात घेतले. या सर्वांवर पाकिस्तानच्या सूचनेनुसार दहशतवादी कारवायांचे समन्वय, वित्तपुरवठा आणि अंमलबजावणी केल्याचा आरोप आहे.

तपासात मोठे खुलासे
तपासात असे दिसून आले की हे सर्व संशयित एका विशेष एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनद्वारे सतत संपर्कात होते. या अ‍ॅप्लिकेशनचा वापर दहशतवादी संघटना भरती, निधी आणि हल्ल्यांचे समन्वय साधण्यासाठी करत होत्या. हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानस्थित दहशतवादी हँडलर अब्दुल्लाह गाजी चालवत होता, जो लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांशी संबंधित आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR