सोलापूर : उत्पन्न खर्च व शिल्लक अशी प्रत्येकांची जीवनशैली असून याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते व आर्थिक गणिताची जुळवाजुळव होत असते. याप्रमाणे प्रत्येकांनी नैसर्गिक साधन संपत्तीचे स्रोत व त्याचा वापर व शिल्लक याची दैनंदिन नोंद ठेवणे म्हणजे लेखापरिक्षण होय असे प्रतिपादन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापुर चे उपअभियंता संजय धनशेटटी यांनी केले.
व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व वक्ते संजय धनशेट्टी, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सोलापुर, वास्तुविशारद महेश पाटील, संस्था संचालक श्री. मधुकर कटकधोंड, प्राचार्य डॉ. उमेश मुगळे, स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. अविनाश पाटील, एन. एस. एस. समन्वयक प्रा. संजय बुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभियंता धनशेट्टी आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, सजीव सृष्टी ही पाण्यावरच अवलंबून असल्याने पाण्याला अनन्य साधारण महत्व असून पाणी अनमोल आहे. त्यासाठी पाण्याचे स्त्रोत, वापर, शिल्लक याचे लेखापरीक्षण मासिक, सहामाही, वार्षिक अशा पध्दतीने झाल्यास पाण्याची टंचाई भविष्यात येणार नाही. तसेच पाणीवचत, पुर्नवापरासाठी जलसाक्षर अभियान अभियंत्यानी समाजात घेवून नैसर्गिक जलसंपत्तीचे संवर्धन करावे असे मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी. मधुकर कटकधोंड आपल्या भाषणात म्हणाले की, पाण्याला जीवनाची उपमा दिलेली असल्याने पाण्याचे मौलिक महत्व अधोरेखित होते यामुळे पाणी वापराबाबत प्रत्येकांनी कंजूषी कृती अंगिकारली पाहिजे असे विवेचन केले.
याप्रसंगी डॉ. उमेश मुगळे यांनी आपल्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती विषद करून जलदिनाचे महत्व व प्रत्येकांची भुमिका या विषयी बोलताना म्हणाले की, पाणी हे निसर्गानी दिलेली देणगी असून त्याचा वापर योग्य रीतीने करणे कमप्राप्त आहे व रेन वॉटर हार्वेस्टिंग, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन चा वापर करून प्रदुषितमुक्त पाण्याची संकल्पना महाविद्यालयात प्रत्यक्षात राबविलेले आहेत त्याचे अनूकरण सर्वानी समाजासाठी करावे असे आवाहन केले.
कार्यकमाची सुरूवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. संस्थचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. जी. के. देशमुख व संस्थापक सचिव अमोल (नाना) चव्हाण यांनी कार्यकमास शुभेच्छा दिल्या. कार्यकमाचे सुत्रसंचालन प्रा. संजय बुगडे यांनी केले तर प्रा. अविनाश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.