16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्रालयातील एंट्रीचे नियम बदलणार

मंत्रालयातील एंट्रीचे नियम बदलणार

मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : राज्याच्या काना-कोप-यातून आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणा-या नागरिकांची संख्या वाढत असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा पण भक्कम रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत.

मंत्रालयात आज आयोजित बैठकीत मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानातून मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडेपर्यंतची व्यवस्था कार्यरत करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंत्रालयातून विधान भवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी जात असतात. अधिवेशनादरम्यान तर विधान भवन ते मंत्रालय वर्दळ वाढलेली असते. विधान भवनात नियमित कार्यालयीन कामासाठी जात असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना सर्व ठिकाणी प्रवेश असलेल्या सुरक्षा पासेस देण्यात याव्यात. मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या भुयारी मार्गामध्ये विधान भवनात जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रवेश मार्ग उपलब्ध करून द्यावा.

दरम्यान, मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचे काम पूर्ण करावे. काम पूर्ण झाल्यास मध्ये लावलेली सुरक्षा जाळे काढून टाकावे. मंत्रालय प्रवेशद्वारावर सामानाची चोख तपासणी करण्यात यावी. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू मंत्रालयात येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR