काबूल : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानच्या अनेक लोकांवर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेषत: इराणने इस्रायल आणि इराण यांच्यात जून महिन्यात १२ दिवस चाललेल्या सशस्त्र संघर्षानंतर ‘अंतर्गत सुरक्षे’चं कारण देत इराणनं अनेक प्रवाशांवर कठोर कारवाई केली आहे. इराणनं दावा केला आहे, की अनेक अफगाण नागरिक इस्रायलसाठी हेरगिरी करत आहेत. इराणची अनेक प्रकारची संवेदनशील माहिती त्यांनी इस्रायलला पुरवली आहे. देशाच्या सुरक्षेलाच त्यामुळे धोका पोहोचला आहे.
इराणने अफगाणी नागरिकांवर केलेल्या हनीट्रॅप आणि हेरगिरीच्या आरोपांसंबंधात अजून कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. तरीही इराणनं आपली ‘कारवाई’ सुरू केली आहे. हेरगिरी आणि इराणमध्ये अवैध प्रवेश तसंच तिथे बेकायदा राहात असल्याच्या कारणावरून इराणनं जुलै महिन्यात १६ दिवसांत तब्बल पाच लाख अफगाणी नागरिकांची हकालपट्टी केली. त्याआधी आणि आताही ही हकालपट्टी अजून सुरूच आहे. याआधी मार्च २०२५ मध्येच इराणने जे अफगाण नागरिक इराणमध्ये बेकायदेशीरपणे राहात आहेत त्यांनी सहा जुलैपर्यंत देश सोडून जावा, नाहीतर त्यांना इराणमधून बळजबरी हाकलण्यात येईल, अशी घोषणा केली होती.
याच कारणानं पाकिस्ताननंही लाखो अफगाणी नागरिकांना आपल्या देशातून हुसकावून लावलं आहे. इराण आणि पाकिस्ताननं केवळ २०२५ मध्ये आजपर्यंत सुमारे १६ लाख नागरिकांची हकालपट्टी केली. या वर्षअखेरीपर्यंत हा आकडा तीस लाखांपर्यंत जाऊ शकतो.