बर्लिन : युरोपमध्ये पडत असलेल्या अतिभीषण उष्णतेच्या लाटेमुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी ऐतिहासिक स्तरावर खाली घसरली आहे. नद्यांचे पाणी आटल्यामुळे एका दुस-या महायुद्धाच्या आठवणी ताज्या होत आहेत. दुस-या महायुद्धाच्या काळात (१९४४ मध्ये) बुडालेली नाझी सैनिकांच्या युद्धनौका आणि सैनिकी जहाजे आता नदीच्या पृष्ठभागावर स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
युरोपातील दुस-या क्रमांकाची सर्वात लांब नदी असलेल्या डॅन्यूबमधील पाण्याच्या पातळीत कमालीची उष्णता आणि दुष्काळामुळे लक्षणीय घट झाली आहे. पाणी कमी झाल्यामुळे दुस-या महायुद्धात बुडालेल्या नाझी जर्मनीच्या डझनभर युद्धनौका आता पृष्ठभागावर दिसत आहेत. सर्बिया देशातीलच्या प्राहोवो बंदराजवळ नदीच्या मध्यभागी गंजलेली जहाजाची रचना आणि तुटलेले मास्ट पाण्यातून बाहेर आले आहेत. सप्टेंबर १९४४ मध्ये, जर्मन नौदलाने, सोव्हिएत सैन्याच्या भीतीने माघार घेत, आपल्या सुमारे २०० युद्धनौका मुद्दाम नदीत बुडवल्या, जेणेकरून शत्रूची प्रगती रोखता येईल. आता पाण्याचा स्तर कमालीचा खाली गेल्याने या जहाजांचे सांगाडे, तोफा आणि अवशेष उघड्या डोळ्यांनी दिसत आहेत.
जिवंत दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा धोका
या पाण्याच्या पृष्ठभागावर आलेल्या नाझी जहाजांमध्ये अजूनही टनावारी न फुटलेला जिवंत दारूगोळा आणि स्फोटके अडकलेली आहेत. पाण्याचा स्तर कमी झाल्याने नदीतील जहाजांच्या वाहतुकीचा मार्ग अतिशय अरुंद झाला आहे. या अवशेषांमुळे इतर व्यापारी जहाजांची धडक होऊन स्फोट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
नद्यांची पातळी धोकादायकरित्या खालवली
जर्मनीमधील राईन आणि एल्बे या मुख्य नद्यांची पातळीही धोकादायक पातळीपर्यंत खाली आली आहे. येथे नद्या सुकल्यामुळे पाण्याच्या तळाशी असलेले जुने हंगर स्टोन्स उघडे पडले आहेत. हे दगड शतकांपूर्वीच्या भीषण दुष्काळाची आठवण करून देतात.
विज संकटाचीही चाहूल
डॅन्यूबच्या घसरत्या पाण्याच्या पातळीमुळे केवळ जुना कचरा बाहेर येत नाही तर मध्य आणि पूर्व युरोपमध्ये विजेचे संकटही निर्माण झाले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अनेक वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असून सरकारला वीज बचतीसाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत. या तीव्र उष्णतेचा आणि दुष्काळाचा थेट परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचा असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
















