मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका करणा-या भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. काल एक बाई विधान परिषदेत विचित्रपणे किंचाळत होती. अनेकजण त्यांची भाषा झोपडपट्टीची असल्याचे बोलत आहेत.
चित्रा वाघ यांनी गुरुवारी विधान परिषदेत अनिल परब यांना उद्देशून भाषण केले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी करा ही मागणी करताना मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली. पण संजय राठोड यांना क्लिनचीट कुणी व का दिली? हे अनिल परब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारावे. मी त्यांच्यासारखे ५६ अनिल परब पायाला बांधून फिरते, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या याच विधानाचा सुषमा अंधारे यांनी आज खरपूस समाचार घेतला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, काल एक बाई विधान परिषदेत विचित्रपणे किंचाळत होती. अनेकजण म्हणाले की, त्या झोपडपट्टीतील भाषा वापरत होत्या. पण, झोपडपट्टीला देखील एक क्लास असतो. झोपडपट्टीतील लोकं आपले इमान विकत नाहीत. सभागृहात आणखी एक बाई होत्या, ज्यांना आम्हीच सदस्यत्व दिले. पण, जिकडे खावा तिकडे थवा असे त्यांचे काम आहे.
बायकांच्या आडून भाजप तीर मारतोय
या बायकांच्या आडून भाजप तिर मारत आहेत, म्हणून मी इथे उत्तर देत आहे. कधीकाळी या बाई पक्ष प्रवेशासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे लोळत आल्या होत्या. संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली असे त्यांचे म्हणणे असेल, तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री कसे?
कालचा थयथयाट प्रतिमा मलिन करणारा
सुषमा अंधारे यांनी यावेळी चित्रा वाघ यांचा उल्लेख वाघबाई असा केला. त्या म्हणाल्या, वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही. भाजप वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा कशा पद्धतीने करून घेत आहे ते दिसून येत आहे. वाघबाईंनी आकडा थोडा कमीच सांगितला. महाराष्ट्राची परंपरा फुले, शाहू आणि आंबेडकरांची आहे. राज्याच्या सभागृहाला मोठी परंपरा आहे. पण कालचा थयथयाट सभागृहाची प्रतिमा मलिन करणारा होता.
पुजा चव्हाण प्रकरण पुन्हा खुले करा
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाघ बाई भटक्या समाजातील लोकांचे करिअर उद्धवस्त करत आहेत. पूजा चव्हाण यांची केस पुन्हा खुली करण्याची गरज आहे. आमच्या पक्षाचे रघुनाथ कुचिक यांचे प्रकरण चित्रा वाघ यांनी लावून धरले होते. या प्रकरणातील पीडित तरुणीने खुलासा केला होता. शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी मला चित्रा वाघ यांनी तसे बोलण्यास सांगितले होते असे ती म्हणाली होती. त्यानंतर महबूब शेख प्रकरणातही चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीवर एफआयआरनुसार बोलण्याचा दबाव टाकला होता.
कबरीचा मुद्दा सरकारच्या अंगाशी
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला ३ महिने लोटलेत. पण त्यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. १०० दिवसांत ज्या लोकांचे घोटाळे बाहेर आले ते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील आहेत. उद्धव ठाकरेंबाबत फेक नेरेटिव्ह तयार करण्याचे काम केले जात आहे. दिशा सालियन प्रकरणात मनिषा कायंदे आधी काय बोलल्या होत्या हे सर्वांना माहिती आहे. औरंगजेबच्या कबरीचा मुद्या अंगाशी आल्यामुळे दिशा प्रकरण काढण्यात आले आहे, असेही सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या.