मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मी पत्नी असल्याचे माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. हे पुरावे मी पुढल्या सुनावणीत कोर्टात सादर करेल, असा दावा मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणा-या करुणा शर्मा मुंडे यांनी केला असूून धनंजय मुंडेंच्या जबाबावेळी कोर्टही हसल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली.
वांद्रे सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या आदेशांना मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांची दोन्ही मुले आपली असल्याचे मान्य केले, पण करुणा या आपल्या पत्नी नसल्याचा दावा केला. त्यांच्या या अजब युक्तिवादावर कोर्टाने आश्चर्य व्यक्त केल्याचे करुणा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. एवढेच नाही तर न्यायाधीशांना त्यांच्या या युक्तिवादावर हसू आवरले नसल्याचेही त्या म्हणाल्यात.
माझ्याकडे लग्नाचे अनेक पुरावे
करुणा शर्मा म्हणाल्या, आजच्या सुनावणीत न्यायाधीशांनी आम्हाला आमच्या लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत. ते पुरावे आम्हाला आज सादर करता आले नाही. कारण, माझ्या वकिलांचा काहीतरी गैरसमज झाला होता. मागील ३-४ दिवसांपासून माझी प्रकृतीही बरी नव्हती. त्यामुळे मी यात लक्ष घातले नव्हते. पण कोर्टाने या प्रकरणी ५ एप्रिल तारखेला पुढील सुनावणी निश्चित केली आहे. त्या दिवशी आम्ही यासंबंधीचे सर्व पुरावे सादर करू. मी धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचे माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. उदाहरणार्थ, आमचे एचडीएफसी बँकेत जॉइंट खाते आहे. धनंजय मुंडे यांची एक कोटी रुपयांची बजाजची पॉलिसी आहे. त्यावर पत्नी म्हणून मी नॉमिनी आहे. त्यांनी जे स्विकृती पत्र लिहून दिले आहे. त्यावरही माझा उल्लेख पत्नी म्हणून आहे असे त्या म्हणाल्या.