पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा रंग जसजसा रंगत चालला आहे तसतसे राजकीय नेत्यांचे वक्तव्यही बेताल होत चालल्याचे दिसते. कुणी काय बोलून समोरच्या उमेदवारावर टीका करेल याचा काही नेम राहिला नाही. तसाच काहीसा प्रकार लोणावळ्यात घडल्याचे दिसून आले. भाजपच्या एका स्थानिक महिला नेत्याने अजित पवारांच्या आमदारावर टीका करताना त्याचा बाप काढला. माळवचा आमदार आपला नसला तरी त्याचा बाप, मुख्यमंत्री आपला आहे असे वक्तव्य त्या महिलेने केले. सुरेखा जाधव असे भाजपच्या महिला नेत्याचे नाव असून त्यांनी चित्रा वाघ यांच्या समोरच आमदार सुनील शेळकेंवर टीका केली.
लोणावळा नगरपरिषद निवडणूक चांगलीच रंगात आली असून भाजप प्रचारसभेत भाजपच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय खळबळ उडाली. आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता त्यांनी बेताल वक्तव्य केले. भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या की कमळाशिवाय काही पर्यायच नाही. गल्ली ते दिल्ली सगळीकडे भाजपच आहे. जरी इथला आमदार आमचा नसेल तरी त्याचा बाप आमचा आहे, मुख्यमंत्री आमचा आहे. त्यामुळे सगळीकडे कमळ फुलवा. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरच सुरेखा जाधव यांनी हे वक्तव्य केलं. त्यावरुन आता नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
आमदार सुनील शेळके यांच्यावर एकेरी भाषेतील टीकेलाही विरोध होत आहे. मात्र, यापूर्वी आमदार सुनील शेळके यांनीही सुरेखा जाधव यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याची चर्चा आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे संकेत दिल्याची चर्चा असताना, लोणावळा भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हावरील काही उमेदवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उघडपणे पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.

