पुणे : परळीत ईव्हीएमसोबत छेडछाड करण्यात आली, त्यासाठीच मला बाजूला करण्यात आले आणि नंतर अकाऊंटवर १० लाख रुपये देण्यात आल्याचे निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी सांगितले. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.
रणजीत कासले हे पुणे विमानतळावर आले आणि ते बीड पोलिसांना शरण जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये धनंजय मुंडेपासून ते मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांपासून ते आयएएस-आयपीएस अधिका-यांपर्यंत सगळ्यांवर रणजीत कासले यांनी आरोप केले आहेत.
रणजीत कासले यांनी या आधी व्हीडीओच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी कोट्यवधींची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. आता रणजीत कासले हे पोलिसांना शरण जात आहेत. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्यांच्यावर ३०२ कलम लागले. त्यामुळे आपणही त्यामध्ये अडकू या भीतीने धनंजय मुंडेंनी कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती असा आरोप रणजीत कासले यांनी केला.
परळीतील निवडणुकीच्या दिवशी १० लाख आले
रणजीत कासले म्हणाले की, निवडणुकीच्या दिवशी, २१ नोव्हेंबर रोजी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने माझ्या अकाऊंटवर १० लाख रुपये आले. त्यानंतर परळीमध्ये ईव्हीएम ज्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी माझी ड्युटी होती. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही यापासून दूर राहा असे वाल्मिक कराडने आपल्याला सांगितले. लोकसभेवेळी मी बोगस मतदान होऊ दिले नव्हते. विधानसभेवेळी धनंजय मुंडे यांची कॅश पकडली होती. त्यामुळेच मला बाजूला करण्यात आले. मला वरून आराम करण्याची ऑर्डर आली आणि ईव्हीएमच्या ड्युटीमधून बाजूला करण्यात आले.