सातारा : प्रतिनिधी
ईव्हीएमविरोधात मारकडवाडी गावात आंदोलन उभं राहत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करुन आंतरराष्ट्रीय समिती नेमून मशीनची तपासणी केली पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावरही हल्लाबोल केला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ईव्हीएमबद्दल बोलताना म्हणाले, माझा २०१९ चा जुना व्हिडिओ दाखवला जात आहे. ईव्हीएम मशीनमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर नाही, अशी माझी माहिती आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम हॅक करता येणार नाही, असे मी त्यावेळी म्हटले होते. परंतु, आंतरराष्ट्रीय समिती नेमून मशीनची तपासणी केली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. ठराविक मशिनमधील मते मोजण्यापेक्षा सर्वच मशिन आणि व्हीव्हीपॅटमधील मते मोजली जावीत. त्यासाठी काही दिवस लागतील, पण हे नाही केले तर लोकांचा संशय वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
संशयाचे वातावरण दूर करा
ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग करणे शक्य आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. भारतात हट्टाने ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला. भारतातील लोकशाही टिकावी, ही जगातील लोकशाही प्रेमी नागरिकांची इच्छा आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत आणि निकालाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात असलेले संशयाचे वातावरण केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारनं दूर करावे, असं आवाहनही त्यांनी केले.
…तर संविधानाला अर्थ उरणार नाही
विधानसभा निवडणूक निकालावर बोलताना ते म्हणाले की, देशातील लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण झाला, त्यामुळे देशात लोकशाही जिवंत आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकशाहीत चढउतार येतात. परंतु, सध्याचा निकाल हा आश्चर्यकारक आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली हे सिद्ध करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची आहे.
माजी सरन्यायाधीश यांच्यावर हल्लाबोल
पक्षांतर बंदीवर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे निर्णय देतील, अशी अपेक्षा होत्या, पण तो निर्णय झाला नाही. निर्णय न घेऊन आणि बेकायदेशीर सरकारला सहकार्य करून एक प्रकारे त्यांनी लोकशाहीचा खून करण्यास मदत केली, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.