डेहराडून : उत्तराखंडमध्ये निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी नवीन पद्धती शोधल्या जात आहेत. आतापर्यंत बोगद्यात समोरून आडवे ड्रिलिंग केले जात होते, मात्र आता ड्रिलिंगची मदत डोंगराच्या माथ्यावरून घेतली जाणार आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, डोंगराच्या माथ्यावरून झाडे हटवली जात आहेत आणि तेथे ड्रिलिंग मशीन ठेवण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून खोदकाम केले जाणार आहे.
नवीन मशिन सुरू झाल्यानंतर बोगद्याच्या पुढील भागाचा ढिगारा हटवण्याचे कामही सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. बोगद्यामधून ढिगाऱ्याला छिद्र पाडण्याचे तीन प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी झाले आहेत. आता अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आडवे तसेच उभे ड्रिलिंग करावे लागेल. त्यांनी सांगितले की, जर सर्व काही ठीक झाले तर कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवस लागू शकतात. १२ नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या पहाटे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अचानक वरून ढिगारा पडू लागला आणि काही वेळातच ढिगारा इतका वाढला की बोगद्यात अडकलेले ४० मजूर बाहेर येऊ शकले नाहीत.