नवी दिल्ल्ली : डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्रातील मोदी सरकारला गुड न्यूज मिळाली असून नोव्हेंबर २०२४ मध्ये देशाचे जीएसटी(वस्तू आणि सेवा कर) संकलन ८.५% ने वाढून १.८२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
जीएसटी संकलन वाढणे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आणि आर्थिक क्रियाकलापांमध्ये वाढ होत आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरच्या या संकलनामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण जीएसटी संकलन १४.५७ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२४ मध्येदेखील जीएसटी संकलनात ९% ची वाढ नोंदवली गेली होती. ऑक्टोबरचे एकूण संकलन १.८७ लाख कोटी रुपये होते, जे आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे संकलन होते.
जीएसटीसोबतच महागाईतही वाढ
वाढीव जीएसटी संकलनामुळे सरकारला विकासकामांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळते. यामुळे रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत सेवांमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. शिवाय, उच्च जीएसटी संकलन हे दर्शविते की अर्थव्यवस्थेत मागणी आणि वापर वाढत आहे. कंपन्यांच्या विक्री आणि सेवांच्या वाढीचाही हा पुरावा आहे. मात्र, जीएसटी संकलन वाढणे हे महागाई वाढण्याचेही लक्षण असू शकते. अनेकदा कंपन्या कराचा बोजा ग्राहकांवर टाकतात, ज्यामुळे किमती वाढतात.