मुंबई : प्रतिनिधी
अनेक राज्यांपेक्षा अधिक बजेट असणा-या व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेची महायुती व ठाकरे बंधूंच्या युतीत अत्यंत चुरशीची लढत झाली असून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या सर्वच एक्झिट पोल मध्ये मुंबईवर भाजप-शिवसेनेची सत्ता येणार व ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसणार असे भाकित करण्यात आले आहे.
राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक होत असली तरी सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्या मुंबई महापालिकेकडे. तब्बल २० वर्षाच्या संघर्षानंतर एकत्र आलेले उद्धव व राज ठाकरे आणि शिवसेना-भाजप युतीत मुंबईच्या सत्तेसाठी जोरदार लढत असून मुंबईकरांनी कोणाच्या पारड्यात यशाचे माप टाकले आहे. याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. गेली पाच दशके मुंबईवर हुकूमत गाजवणा-या ठाकरे ब्रँडचे अधिराज्य कायम राहणार की नाही? देशाच्या आर्थिक राजधानीचे महापौरपद मिळवण्याचे भाजपचे अनेक वर्षांचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा, नगरपरिषदांप्रमाणे कौल मिळणार का? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर गुरुवारी मतदान यंत्रात बंद झाली आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांची प्रतिष्ठा तर पणाला लागली आहेच, पण या निवडणुकीच्या निकालाचा राज्याच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. राजकारणाची दिशा ठरणार आहे. मुंबईत भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती आहे. त्यांची प्रमुख लढत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीसोबत आहे. ठाकरे बंधूसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. तर राज्यातील महायुतीचा घटक असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढत आहे. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढत आहे. याशिवाय समाजवादी पार्टी, एमआयएम चेही उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. गुरुवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अनेक एक्झिट पोल प्रसिद्ध झाले असून त्यात महायुती बाजी मारणार असे भाकित करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका (एकूण जागा २२७ बहुमतासाठी ११४ जागा)
जनमत एक्झिट पोल
भाजप-शिवसेना – १३८
ठाकरे बंधू-पवार गट – ६२
काँग्रेस-वंचित – २०
इतर – ७
लोकशाही – रुद्र रिसर्च एक्झिट पोल
भाजप-शिवसेना – १२१
ठाकरे बंधू-पवार गट – ७१
काँग्रेस-वंचित – २५
इतर – १०
आज तक – ऍक्सिस एक्झिट पोल
भाजप-शिवसेना – १३१ ते १५१
ठाकरे बंधू-पवार गट – ५८ ते ६८
काँग्रेस-वंचित – १२ ते १६
इतर – ६ ते १२
जेडीएस एक्झिट पोल
भाजप-शिवसेना – १२७ ते १५४
ठाकरे बंधू-पवार गट – ४४ ते ६४
काँग्रेस-वंचित – १६ ते २५
इतर – ००

