नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील कोतवालबर्डी शिवारात स्थित एशियन फायर वर्क्स कंपनीत रविवारी दुपारी २ वाजता भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत मध्य प्रदेशातील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
मृत्यू झालेल्या कामगारांमध्ये मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील बिलमा येथील भुरा लक्ष्मण रजत(२५) आणि घुगरी मांडला येथील मुनीम मडावी(२९) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये काटोल तालुक्यातील डोरली (भिंगारे) येथील सौरभ लक्ष्मण मुसळे (२५), घनश्याम लोखंडे(३५) आणि कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील सोहेल उर्फ शिफान शेख (२५) यांचा समावेश आहे. ५० कामगारांची क्षमता असलेल्या या कंपनीत स्फोटाच्या वेळी एका युनिटमध्ये सात कामगार कार्यरत होते.
दुपारच्या जेवणाच्या वेळेमुळे दोन कामगार घरी गेले होते आणि एक बाहेर गेला होता. उर्वरित पाच कामगार युनिटजवळ असताना हा स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागपूर ग्रामीण पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. गेल्या काही वर्षांत नागपूर परिसरात अशा प्रकारचे अनेक स्फोट झाले आहेत.
नुकताच मध्ये भंडा-यातील आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू, २०१६ मध्ये पुलगाव येथील दारूगोळा डेपोत १७ जणांचा मृत्यू आणि २०२४ मध्ये धामना येथील स्फोटक कंपनीत ६ जणांचा मृत्यू झाला होता.