अकोला : आज सोयाबीनच्या सरकारी खरेदीचा शेवटचा दिवस आहे. आजच्या या शेवटच्या दिवशीही अनेक शेतक-यांच्या सोयाबीनची खरेदी होणं बाकी आहे. याच मुद्यावरुन शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. सोयाबीन खरेदीला एक महिना मुदत वाढ द्या, अन्यथा राहिलेले सोयाबीन मुंबईतील अरबी समुद्रात फेकून देऊ असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
अनेक शेतक-यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे. राज्याचे सोयाबीनचे उत्पादन हे ६० ते ६५ लाख मेट्रीक टन आहे. त्यातील सरकार १३ लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी करणार आहे. त्यातील सरकारने फक्त ७ ते ८ लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी केले आहे. राहिलेले सोयाबीन आम्ही कुठे फेकायचे? असा सवाल तुपकर यांनी केला आहे. ही योजना शेतक-यांसाठी आहे की व्यापा-यांसाठी आहे? असा सवालही त्यांनी केला. ज्या संस्थाची अवकात नाही, त्या संस्थाना सोयाबीन खरेदी करण्याचे अधिकार दिले असल्याचे तुपकर म्हणाले. सोयाबीन खरेदी करणा-या संस्थांनी प्रचंड मोठा घोळ घातल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. यांनी खाली लोकं नेमले आहेत. आचारसंहितेच्या काळात राज्याचे पणन सचिव आणि पणनचे संचालक यांनी घोळ घातला आहे. ज्या संस्थाची औकात नाही, त्यांना सोयाबीन खरेदीचे टेंडर दिले जात असल्याचे तुपकर म्हणाले.
आज सोयाबीनच्या सरकारी खरेदीचा शेवटचा दिवस होतो. शेवटच्या दिवशीही अकोला जिल्ह्यातील १ लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी होतीे. जिल्ह्याला साडेनऊ लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्यापैकी साडेआठ लाख क्विंटल सोयाबीन आतापर्यंत खरेदी करण्यात आले आहे. शेतक-यांच्या सोयाबीनची हमी केंद्राच्या माध्यमातून खरेदीसाठी अंतिम मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. आज अकोल्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतक-यांनी सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या रांगा लावलेल्या होत्या.
सध्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर ३८०० ते ४००० रुपयापर्यंत घसरलेत. हमी केंद्रावर सोयाबीनला ४८५१ रुपये क्विंटलचा दर आहे. त्यामुळे या केंद्रावर शेतक-यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. परंतु, अजूनही शेतक-यांचे सोयाबीनची खरेदी बाकी आहे. शेवटच्या शेतक-यांपर्यंत सोयाबीनची खरेदी करा अन्यथा प्रतिक्विंटला सोयाबीनला ३००० रुपये द्या अशी मागणी देखील तुपकरांनी केली.