नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत ११ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संजय सिंग यांना सोमवारी दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संजय सिंग यांना ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. ईडीने शनिवारी संजय सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
युक्तिवादादरम्यान, ईडीने एक अर्ज देखील दाखल केला होता, ज्यामध्ये संजय सिंह यांच्याविरुद्ध दाखल केलेले आरोपपत्र सीलबंद कव्हरमध्ये ठेवावे जेणेकरून साक्षीदारांची ओळख पटू नये. ज्यावर न्यायालयाने म्हटले की, आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी असा अर्ज दाखल करावा. न्यायालयाने याचिकेवरील आदेश राखून ठेवला असून आरोपपत्र सीलबंद कव्हरमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. राऊस अॅव्हेन्यू कोर्ट ६ डिसेंबरला या खटल्याचा निकाल देणार आहे.
ईडीच्या या अर्जाला संजय सिंह यांच्या वकिलाने विरोध केला. संजय सिंह यांच्या वतीने सांगण्यात आले की, ईडीने हे आरोपपत्र मीडियामध्ये आधीच लीक केले आहे. आरोपपत्राची प्रत मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे, तो हिरावून घेता येणार नाही. राऊस अॅव्हेन्यू कोर्ट ११ डिसेंबर रोजी संजय सिंह यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊ शकते. आरोपपत्राची प्रत आरोपींच्या वकिलाला देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.