लखनौ : ज्ञानवापी मशीद संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण अहवाल पूर्ण करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी वाराणसी जिल्हा न्यायालयाने सोमवारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) आणखी एका आठवड्याची मुदतवाढ दिली. हिंदू बाजूचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले की, या खटल्याची सुनावणी करताना जिल्हा न्यायाधीश ए.के.विश्वेश यांनी एएसआयला सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ दिला.
न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख १८ डिसेंबर निश्चित केली आहे. अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी बाजू मांडताना सांगितले की, एएसआयने आपल्या अर्जात अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ अविनाश मोहंती यांची प्रकृती अस्वास्थ्य, रक्तदाब अचानक वाढणे आणि सोमवारी अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यास असमर्थता दर्शविली. एएसआयला सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने सहाव्यांदा वेळ दिला आहे.
यापूर्वी न्यायालयाने एएसआयला ६ सप्टेंबर, ५ ऑक्टोबर, २ नोव्हेंबर, १७ नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबरला अतिरिक्त वेळ दिला होता. गेल्या वेळी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयाने एएसआयला ज्ञानवापी संकुलाचा पाहणी अहवाल ११ डिसेंबरपर्यंत सादर करण्यास सांगितले होते. एएसआयने आपल्या अर्जात म्हटले होते की, विविध तज्ञांनी दिलेली माहिती आत्मसात करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे.