धाराशिव : मराठा जनआक्रोश मोर्चाच्या नावाखाली खंडणी वसुली करत असल्याचा आरोप करत एकाला मराठा आंदोलनकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. आशिष विशाळ असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिका-यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच त्याला भर चौकात मराठा कार्यकर्त्यांकडून बेदम चोप देण्यात आला. संबंधित व्यक्तीच्या फोन कॉल्स आणि बँक खात्यांची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मदत करायची म्हणून आशिष विशाळ या व्यक्तीने अनेक अधिका-यांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप आहे. तसेच आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या नावाचा वापर करून त्याने अनेक अधिका-यांना धमकावल्याचाही आरोप केला जात आहे.
सुरेश धस आणि मराठा मोर्चाचे नाव वापरले
धाराशिव इथे मराठा जन आक्रोश आंदोलनाच्या नावावर आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत अशिष विशाळने अधिका-यांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये स्वत:ला आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सांगणा-या अशिष विशाळने अधिका-यांना धमकावत खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. तसेच मराठा जन आक्रोश आंदोलनाच्या नावावर पैसे उकळल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या बहाण्याने आशिष विशाळने अधिका-यांना वेठीस धरत असल्याचा आरोप आहे. या गैरप्रकारामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाची व आमदार सुरेश धस यांची बदनामी होत असल्याचे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे. त्यामुळेच आशिष विशाळला त्यांनी भरचौकात चोप दिला. या प्रकरणात अद्याप पोलिसात कुठलीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.