24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरप्रदीर्घ रजेनंतर शिक्षणाधिकारी फडके रुजू

प्रदीर्घ रजेनंतर शिक्षणाधिकारी फडके रुजू

सोलापूर : प्रदीर्घ रजेवर गेलेले सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी पुन्हा पदभार घेतला आहे. दरम्यान, आता पुन्हा मी आल्याने जिल्ह्यातील विविध शाळांचे, शिक्षकांचे, शिक्षणेत्तर कर्मचारी आणि प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न गतीने सोडविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नव्याने पदभार घेतलेले माध्यमिक शिक्षण अधिकारी मारुती फडके प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन महिन्यापूर्वी प्रदीर्घ रजेवर गेले होते.

त्यामुळे माध्यमिकचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला होता. तब्येत ठीक झाल्यानंतर फडके यांनी पदावर हजर राहण्याची तयारी दाखवली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी प्रदीर्घ रजा असल्याने त्यांना वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र आणण्याबाबत सूचित केले होते. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय मंडळासमोर हजर राहून फडके यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र हजर केल्यानंतर प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी त्यांना हजर करून घेतले आहे.

त्यामुळे बऱ्याच काळानंतर प्रलंबित राहिलेले माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर व प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आता सुटण्यास मदत होणार आहे. इकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी घेतला. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्य प्रा. शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे, जिल्हा संघाचे बब्रुवाहन काशिद, जिल्हाध्यक्ष अनिरूध्द पवार, जिल्हा सरचिटणीस सुर्यकांत हत्तूरे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजीत थीटे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रमोद कुसेकर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR