मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम जगभरात लोकप्रिय आहे. अनेक दिग्गज मंडळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे रसिक आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा हा शो बघतात. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द विनोदवीर समीर चौघुलेंना सांगितले होते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये समीर चौघुले यांनी एक खास किस्सा सांगितला.
नुकतेच समीर चौघुले यांनी या शोमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, मी एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विमानात भेटलो. तेव्हा ते मला म्हणाले, चौघुले जरा इकडे या, हे बघा मला वाटले आता काय दाखवत आहेत? तर त्यांनी त्यांच्या मोबाईलची स्क्रीन माझ्याकडे वळवली. त्यांनी मला त्यांच्या मोबाईलच्या टाइमलाईनवर असलेला महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो दाखवला. ते म्हणाले, हे बघा, माझी टाइमलाईन दिसतेय तुम्हाला सगळे महाराष्ट्राची हास्यजत्राचेच एपिसोड आहेत. आम्ही फक्त तुमचेच एपिसोड बघत असतो.
२०१८ मध्ये सुरू झालेला हा शो आजही प्रेक्षकांच्या हृदयात तितकाच ताजातवाना आहे. या शोने मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे काम इतक्या वर्षांपासून यशस्वीरीत्या केले आहे. या शोमध्ये विविध कलाकार रंगतदार नाटिका, स्टँडअप परफॉर्मन्स आणि भन्नाट विनोद सादर करतात. प्रत्येक भागात वेगवेगळे हास्यस्पद कॉन्टेन्ट असल्यामुळे प्रेक्षकांचा रस कधीच कमी होत नाही. या शोमधून अनेक कलाकार घराघरात पोहोचले. त्यात विशेषत: समीर चौगुले, विशाखा सुभेदार, वनिता खरात, पृथ्वीक प्रताप या कलाकारांनी त्यांच्या खास अभिनयाने आणि संवादफेकीने प्रेक्षकांना खूप हसवले आहे.