मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुकीत जनतेला मोठी मोठी आश्वासने दिली. मात्र सत्तेत आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला. लाडक्या बहिणी, एसटी कामगार व शेतक-यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, अशा अस्मानी-सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी जीवन संपवत आहे, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथील हरिदास विश्वंभर बोंबले यांनी केलेली आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर बोलताना टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप युती सरकारवर तोफ डागली. नांदेड जिल्ह्यातील हरिदास बोंबलेची आत्महत्या ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली. अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने दिलेली नाही, कोणतीही सरकारी मदत नाही आणि कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही, यामुळे जगणे अस झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत.
हे आंधळे, बहिरे व मुके सरकार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फिरण्यापेक्षा मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे व शेतक-यांना मदत करावी. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, रोजगार नसल्याने गावातून लोक शहराकडे पलायन करत आहेत, पिण्यासाठीही पाणी नाही. जलजीवन योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले असून ही योजनाच भंकस आहे पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही असेही सपकाळ म्हणाले.