25 C
Latur
Saturday, October 25, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीस-जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार

फडणवीस-जरांगे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार

जरांगेंनी दिला उपस्थित राहण्यास होकार राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

मंगळवेढा : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला या दोन्ही नेत्यांची उपस्थिती निश्चित झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या भव्य सोहळ्याचे आयोजन भाजपचे पंढरपूर-मंगळवेढा आमदार समाधान अवताडे यांनी केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनाही कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार तसेच सर्व पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही अवताडे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे एका स्टेजवर दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व प्रचंड वाढले आहे. पुतळा समितीचे सदस्य कौंडू भैरी यांनी सांगितले की मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जरांगेंनीही या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे असे त्यांनी म्हटले.

यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले नव्हते. ओबीसी समाजाची नाराजी वाढू नये म्हणून सरकारने त्या वेळी सावध भूमिका घेतली होती. मात्र, आता दोघेही एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR