छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेते विनोद पाटील यांची अचानक त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. मराठवाड्यातील सध्याची परिस्थिती पाहता फडणवीस आणि पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद पाटील यांची भेट चर्चेत असली तरीही या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. ही भेट राजकीय नव्हती तर कौटुंबिक होती, असे घरातून निघतेवेळी फडणवीस यांनी सांगितले.
पाटील यांना विधान परिषद देणार का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. राजकारणात एक निवडणूक कोणाचे भवितव्य ठरवत नाही. विनोद पाटील यांच्यात नेतृत्त्वगुण आहेत. त्यांनी सातत्याने सामाजिक भूमिका घेतलेली आहे. ते राजकीय भूमिका घेतील तेव्हा कदाचित वेगळा विषय आपल्याला पाहायला मिळेल, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी संधी मिळाली तेव्हा मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला. त्यामुळे कुणी किती टीका केली, वाद केला तरी त्याकडे दुर्लक्ष करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.