मुंबई : प्रतिनिधी
वाझेने फडणवीसांना लिहिलेल्या या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर आता यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. अशात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वाझेने लिहिलेल्या पत्रावर शंका उपस्थित करत, सचिन वाझेला हे पत्र फडणवीसांनीच लिहायला लावले नाही कशावरून? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अंधारे पुढे म्हणाल्या की, फडवणीस संशयाच्या भोव-यात आहेत. त्यांनी महाराष्ट्र नासवला, महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवली. इथल्या कायदा -सुव्यवस्थेचा वापर विरोधकांना जायबंदी करण्यासाठी केला.
या प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘सचिन वाझेच्या पत्रावर जेव्हा वातावरण तापते तेव्हा प्रश्न पडतो की, सचिन वाझे म्हणजे हरिश्चंद्र आहे का? सचिन वाझे ज्या वेळेला हे आरोप करत आहे, ती वेळ महत्त्वाची आहे.
कारण अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर जे गंभीर आरोप केले त्यानंतरच वाझेचे हे पत्र समोर आले आहे. जर वाझेला पत्रच लिहायचे होते तर तो इतके दिवस का शांत होता? त्याला पत्र लिहायचेच होते तर न्यायसंस्थेला लिहायचे होते. ते पत्र फडणवीसांनाच का लिहिले जातेय.. फडणवीस स्वत:च संशयाच्या भोव-यात आहेत.