पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या भाषणांचे संकलन असलेल्या ‘ऐकलंत का?’ या पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी सकाळी पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना दुसरे पुस्तक लिहिण्याचे सुचवले आहे. चांदेरे यांच्या पुस्तकातून राज्याचा सामाजिक, सांस्कृतिक आलेखच मांडला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प समजून घेताना’ हे एक पुस्तक लिहिले आहे. आता त्यांना चांदेरेंचे पुस्तक देतो व दुसरे पुस्तक ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर लिहा असे सुचवतो असे पवार यांनी म्हणताच सभागृहात हास्यस्फोट झाला.
यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, आमदार शंकर मांडेकर, बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, लेखक चांदेरे, दिलीप मोहिते-पाटील, रमेश ढमाले, अशोक पवार, सुरेश घुले, विजय कोलते, चंद्रकांत मोकाटे, स्वप्नील ढमढेरे व अन्य राजकीय, सामाजिक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणाला सुसंस्कृतपणाचा वारसा दिला. आजच्या राजकारणात तो दिसत नाही अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. राजकारण हे सेवा करण्याचे, समाज परिवर्तनाचे साधन आहे हे मान्य असणारे फार कमी लोक आता राजकारणात राहिले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक देखील होते. भाषेवरचे प्रभुत्व आणि विचारांची मांडणी याव्दारे त्यांनी समस्त महाराष्ट्राला खिळवून ठेवले होते.
वाचनाचा पाया पक्का असल्यास आपली विचारांवरची निष्ठा कायम राहून आपल्या भूमिकेवर ठाम राहता येते. ज्ञान, अनुभव आणि वक्तृत्व चांगले असले म्हणजे भाषण चांगले होते असे नाही, तर ज्या व्यक्तीविषयी आपण बोलतो त्या व्यक्तीविषयी मनात कणव, तळमळ, प्रेम असेल, तरच ते भाषण आणि मनाचा ठाव घेणारे होते.
रामदास फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. दुर्गाडे यांनी प्रास्तविक केले. लेखक सुनील चांदेरे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे आणि चित्रा खरे यांनी केले.