मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या मंर्त्यांनी आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहिष्कार घातला. शिवसेनेकडून केवळ एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. भाजपकडून करण्यात येणा-या फोडाफोडीमुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गैरहजर राहिले.
मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भेटीसाठी गेले होते. यावेळी तुम्ही जे करताय, ते योग्य नाही असे शिवसेनेचे मंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाले. तसेच कल्याण-डोंबिवलीतल्या ऑपरेशन लोटसवरुन देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार देखील केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी देखील शिवसेनेच्या मंर्त्यांना एकनाथ शिंदेंसमोर चांगलेच सुनावले. गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले हे मंत्री मुख्यमंर्त्यांना भेटीला जात नाराजी व्यक्त करायला गेले होते. यावेळी तुम्ही उल्हासनगरमध्येही हेच करताय, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या या मंत्र्यांना सुनावले.
भाजपमुळे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री नाराज
शिंदे गटाच्या नाराजीमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सुरु असलेली फोडाफोडी कारणीभूत असल्याचे समजते. आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जातीने उपस्थित होते. भाजपने कालपासून ही बातमी गुप्त ठेवत श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या नगरसेवकांना गळाला लावले होते.

