मुंबई : महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे भाकीत केले असून त्यावरून राज्यात चर्चेला उधाण आले आहे. सन २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्याला एकनाथ शिंदे यांच्या एका कृतीची किनार आहे.
महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेले नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकनाथ शिंदे अचानक गावी गेले. तिथून ठाण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील बडे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची चर्चा झाली. यापूर्वी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी नंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. महायुतीत पालकमंत्री पदावरून टोकाचे वाद दिसले. पण बडे नेते याविषयीची कोणतीही कटुता सार्वजनिकपणे न मांडण्याची प्रथा मोडत नाहीत हे विशेष.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीने तिथे हजर राहिले. त्यांनी तिथे जाऊन महाराष्ट्रातील पर्यटकांना दिलासाच दिला नाही. तर त्यांची महाराष्ट्रात परतण्याची व्यवस्था केली. जखमींची भेट घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना मदतासाठी पाठवले होते. पण ही श्रेयवादाची लढाई असल्याचे बोलले जात होते.
दरम्यान एका सभेत बोलताना बावनकुळे यांनी मोठे भाकीत केले. २०३४ पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे बावनकुळे म्हणाले. विकसीत महाराष्ट्र हा फडणवीस यांचा संकल्प आहे. फडणवीस मुख्यमंत्री असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकारच राज्याचा विकास, भले करू शकतात असे बावनकुळे म्हणाले.
एकनाथ शिंदेंचा हात जोडून नमस्कार
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याची एकच चर्चा होत आहे. भाजपच्या नेतृत्वातच आता यापुढे सरकार चालणार असा त्यामागे हेतू असल्याची चर्चा होत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी याविषयी विचारले असता, त्यांनी हात जोडत नमस्कार केला आणि शुभेच्छा अशा एका शब्दात प्रतिक्रिया दिली.
त्यांना २०८० पर्यंत मुख्यमंत्री राहु द्या : कदम
तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावर धडक प्रतिक्रिया दिली. २०३४ कशाला ते २०८० पर्यंत मुख्यमंत्री राहू द्या, असा चिमटा त्यांनी काढला. पण त्याचवेळी आमच्यात कोणी भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही असे सांगायला ते विसरले नाहीत.