लखनौ : उत्तर प्रदेशातील एका गावातून देशभरातील नागरिकांचे जन्माचे दाखले तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या १९ महिन्यांपासून हा गैरप्रकार इथे सुरु होता. यूपीतल्याच ४७ जिल्ह्यांमधील नागरिकांचे जन्म दाखलेही इथे तयार करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील सलोन इथून बनावट जन्म दाखले तयार करण्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. त्यानंतर आता हाथरसच्या सिंचावली गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणच्या व्हीडीओच्या आयडीच्या माध्यमातून हे जन्माचे दाखले तयार केले जात होते. या प्रकारचे आत्तापर्यंत ८१४ प्रकरणे समोर आली आहेत. पण याची संख्या वाढू शकते. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश हाथरसच्या जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. सिंचावली गावचे ग्रामसेवक इश्वरचंद्र यांना ३ ऑगस्ट रोजी नागरिक नोंदणी प्रणालीचा आयडी मिळाला होता. या अधिका-याचा आयडी तपासल्यानंतर त्यातून १ जानेवारी २०२३ ते २ ऑगस्ट २०२४ दरम्यान सुमारे ८१४ जन्माचे दाखले दिल्याचे निष्पण्ण झाले.
धक्कादायक बाब उघड
हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर विभागीय अधिका-यांना याची माहिती देण्यात आली. यातही कहर म्हणजे आरोग्य विभागाचे अप्पल संचालक डॉ. मोहन झा यांनी सांगितले की, हाथरसच्या तीस ग्रामपंचायतींचं आयडी अद्याप तयारच केले गेलेले नाहीत. पण आता या आयडीवरुन हे काम कोणी केले? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. एखाद्या हॅकरनं हे काम केले आहे की कोणी या आयडीचा गैरवापर केला हे तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. पण हा आयडी ग्रामसेवकाकडे पोहोचलेला नसताना तत्पूर्वीच ही प्रमाणपत्रे जाहीर करण्यात आली.
कोणत्या राज्यांत बनावट दाखले?
सिंचावली इथून सहा राज्यातील लोकांचे बनावट जन्म दाखले तयार करण्यात आले. यामध्ये बिहार (१२), हरयाणा (४), झारखंड (१३), कर्नाटक (१), मध्य प्रदेश (४) तर एकट्या उत्तर प्रदेशातील ७८० नागरिकांचे दाखले तयार करण्यात आले आहेत.