गडचिरोली : भामरागड तालुक्यातील जंगलातील घनदाट कुडकेली परिसरात बनावट दारु कारखान्याचा गुन्हे शाखेने १४ रोजी रात्री पर्दाफाश केला. याप्रकरणी धुळ्याच्या चौकडीला अटक केली होती तर दोघे अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत पळाले होते. दरम्यान, पोलिसांनी मुख्य सूत्रधार कुख्यात दारू माफिया धर्मा निमाय रॉय (३८, रा. चामोर्शी) व त्याचा सहकारी शुभम सपन बिश्वास (२६, रा. ताडगाव ता. भामरागड) याच्या १६ मे रोजी मुसक्या आवळल्या.
कुडकेली हा नक्षलग्रस्त परिसर असून तेथील जंगल परिसरात बनावट देशी दारूचा कारखाना सुरु केल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून जवळपास ४० लाखांच्या मुद्देमालासह वसंत प्रदान पावरा (१९, रा. बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे, शिवदास अमरसिंग पावरा (३५, रा.धाबापाडा, ता. शिरपूर, जि. धुळे), अर्जुन तोयाराम अहिर (३३ रा. धुळे), खीद्र नारायण पावरा (१८, रा. सलाईपाडा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांना ताब्यात घेतले. १६ रोजी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कुख्यात दारू तस्कर धर्मा रॉय आणि त्याचा साथीदार शुभम बिश्वास याच्या इशा-यावर तेथे बनावट दारुचा उद्योग सुरु होता.
२५ वर्षांपासून तस्करी, रॉयवर १५ गुन्हे दाखल
जिल्ह्यातील दारु तस्करीत धर्मा रॉय हे कुप्रसिध्द नाव आहे. त्याच्यावर २५ वर्षांच्या गुन्हेकारकीर्दीत १५ गुन्हे नोंद आहेत. अल्पवयातच तो या धंद्यात उतरला होता. सन २००० मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा नोंद झाला. सुरुवातीला छोटी-मोठी तस्करी करणा-या रॉयने अल्पावधीत या धंद्यात जम बसवला. राजकीय नेत्यांसोबत त्याची उठबस आहे. दक्षिण गडचिरोलीतील पोलिस व वनविभागाच्या अधिका-यांशी हितसंबंध निर्माण करत त्याने बनावट दारु कारखाना थाटण्यापर्यंत मजल मारली. गेल्या काही दिवसांत भूमिगत राहून तो रॅकेट चालवायचा. अखेर त्याच्या हाती बेड्या पडल्या.