नवी दिल्ली : चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचीनचा भाग असल्याचे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील पेमा वांगजॉम नावाच्या महिलेला चीनी अधिका-यांनी थांबवल्याप्रकरणी भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय, चीनने अरुणाचल प्रदेशाबाबत केलेल्या दाव्यालाही जोरदार प्रत्युत्तरही दिले.
पेमा वांगजॉम वैध भारतीय पासपोर्टवर लंडनहून जपानला जात होत्या. चीनच्या शांघायमध्ये त्यांचा 3 तासांचा हॉल्ट होता. यादरम्यान, चीनी अधिका-यांनी त्यांचा पासपोर्ट ‘इनव्हॅलिड’ असल्याचे सांगत, त्यांना जवळपास १८ तास रोखून ठेवले. हे प्रकरण समोर आल्यानंतर, भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, या प्रकरणावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या की, या महिलेवर कोणतीही बळजबरी, अटक किंवा छळ करण्यात आला नाही. चीनच्या सीमा निरीक्षण अधिका-यांनी सर्व प्रक्रिया कायद्याप्रमाणेच केली आहे. यासोबतच माओ निंग यांनी अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा दावा केला.
अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग
चीनच्या या दाव्याला प्रत्युत्तर देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, पेमा यांना अडवणे हे चीनकडून आंतरराष्ट्रीय विमान प्रवास नियमांचे उघड उल्लंघन आहे. याशिवय, त्यांनी स्पष्ट केले की, अरुणाचल प्रदेश भारताचा अभिन्न भाग आहे. येथे राहणा-या नागरिकांना भारतीय पासपोर्ट धारण करण्याचा पूर्ण वैध अधिकार आहे. चीनचे दावे वास्तव बदलू शकत नाहीत.
चीनकडून नियमभंग?
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निदर्शनास आणले की, चीनच्या स्वत:च्या धोरणानुसार सर्व देशांच्या नागरिकांना २४ तास व्हिसा-फ्री ट्रान्झिटची परवानगी आहे. अशा स्थितीत पेमा यांना रोखणे पूर्णपणे नियमबा होते.

