मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांना तब्येतीच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ७९ वर्षीय सुभाष घई यांना काल अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आळे. सध्या ते वैद्यकीय निगराणीखाली आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुभाष घई यांना काल रात्री लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. न्यूरोलॉजिस्ट डॉ विजय चौधकी, हृदय रोग विशेषज्ञ डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ जलील पारकरससह इतर टीम यांच्या निगराणीखाली घईंवर उपचार सुरु आहेत. श्वासासंबंधी तक्रारी, अशक्तपणा, सतत चक्कर येणे, स्मृती कमी होत जाणे आणि बोलताना अडचण येणे अशा अनेक समस्या त्यांना जाणवू लागल्या. आता ते उपचारांना प्रतिसादही देत आहेत. दोन दिवसांनी त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचीही शक्यता आहे.
तर घई यांच्या निकवर्तियाने स्पष्ट करत सांगितले की, आम्ही सांगू इच्छितो की सुभाष घई आता स्वस्थ आहेत. त्यांना नियमित उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आणि आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि काळजीसाठी धन्यवाद. सुभाष घई यांनी खलनायक, राम लखन, ताल, परदेस यांसारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. २०१४ साली त्यांनी कांची हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. यानंतर १० वर्ष झाली त्यांनी अद्याप एकही सिनेमा दिग्दर्शित केलेला नाही.