परभणी : येथे सुरु असलेल्या पुर्णवाद संगीत संमेलनाच्या दुस-या दिवशीच्या प्रात:कालीन सत्रात ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिकाअपुर्वा गोखले (पुणे) यांच्या गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते. त्यांनी प्रभातभैरव रागाने आपले गायन आरंभिले. काहीशा अनवट अशा या रागात दोन्ही माध्यमांचा वापर करीत त्यांनी मैफल जमविली. तबलावादक स्वप्निल भिसे, हार्मोनियम वादक डॉ.चैतन्य कुंटे यांची साथसंगत अनुरुप व आदर्श अशी होती.
प्रभात भैरव नंतर गायिकेने हिंडोल -बहार रागाची मांडणी केली. शेवटी शुद्ध सारंग राग गावून त्यांनी गायन संपविले. प्रारंभी अश्विनी हिंगे व प्रसाद हिंगे, स्वाती दैठणकर, अतूल सौदणकर यांनी कलावंतांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभय कुळकर्णी यांनी तर आभार अय्यर यांनी मानले. आज दिवसभरात होणा-या विविध कार्यक्रमासाठी संपूर्ण मराठवाड्यातून संगीत क्षेत्रातील जाणकार, साधक विद्यार्थी उपस्थित होते.