पंढरपूर : नैसर्गिक बदलामुळे त्रस्त असलेल्या तालुक्यातील कासेगाव, अनवली व पुळूज तसेच मोहोळ तालुक्यातील आढेगाव या भागातील द्राक्ष उत्पादक, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी फवारलेल्या कीटकनाशकमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात ५० एकरावरील बागा जळाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती राज्य द्राक्ष बागायत संघाचे सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी दिली.
मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर एक नामावंत कंपनीच्या कीटकनाशकाची फवारणी केली. यात पंढरपूर तालुक्यातील कासेगावसह मोहोळ तालुक्यातील आढेगाव, पुळूज येथील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा जळून गेल्या आहेत. यासह खरबूज, कलिंगड बागही जळून गेल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या औषधाच्या फवारणीने पन्नास एकरापेक्षा जास्त बाग जळाल्या असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
यामध्ये अनवली येथील पोपट शिवदास घोडके, समाधान अर्जुन घोडके, पांडुरंग शिवाजी कदम, धनाजी जनार्दन देशमुख, कासेगाव येथील वसंत दामू शिंदे, सदाशिव बाबा गवळी, अजिंक्य तानाजी देशमुख, अक्षय तानाजी देशमुख, नेहाल नेताजी देशमुख, संकेत सयाजी देशमुख, मोहोळ तालुक्यातील राजाराम बारबोले (रा. आढेगाव) व पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील काही शेतकऱ्यांचे देखील याच प्रकारे नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व संबंधित कंपनीवर माल विक्रीसाठी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी प्रशांत देशमुख यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी देशमुख यांनी दिला आहे.
या संदर्भात उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांना विचारले असता ते म्हणाले, या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. भदाणे, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह नुकसान झालेल्या काही बागांची पहाणी काल केली. शेतकऱ्यांनी जे किटकनाशक फवारले आहे त्याचे नमुने पुण्याला शासकीय लॅब मध्ये तपासणी साठी पाठवले आहेत तर द्राक्ष बागांची पाने मांजरी येथे तपासणी साठी पाठवली आहेत. आता पर्यंत पाच,सात शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. तथापी दक्षता म्हणून संबंधित औषधे आणखी कोणत्या शेतकऱ्यांनी खरेदी केली आहेत. त्याची माहीती घेतली जात आहे.