जालना : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतर्कयांना कर्ज माफी देऊ, शेत मालाला योग्य हमी भाव देऊ, अशी आश्वासने महायुतीच्या नेत्यांनी दिली होती. मात्र आश्वासनाच्या खैराती करत सर्वसामान्य मतदार, शेतक-यांची मते पदरात पाडून घेतल्यावर आता सरकार शेतकरी कर्ज माफी होणार नाही, आपापली कर्ज भरा, असे सांगत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे शेतकरी कर्ज माफी होणे शक्य नाही. राज्याची तशी आर्थिक परिस्थिती नसल्याचे, स्पष्ट केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनीही त्यांचीच री ओढली. यानंतर शेतक-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी शेतक-यांनी आता स्वत:चे भले पहावे, आपल्या कुटुंबाचा आणि भविष्याचा विचार करून परिवर्तन वादी बनावे.
पक्ष, नेता हे सगळे विसरून शेतकरी म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. जे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि सरकारमधील कोणीही शेतक-यांना कर्जमाफी देणार नाही असे सांगतात त्यांना आतापासूनच गाव बंदी केली पाहिजे असे आवाहनही जरांगे यांनी शेतक-यांना केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज जेव्हा एकजूट होऊन रस्त्यावर उतरला तेव्हाच न्याय मिळायला सुरुवात झाली.
शेतक-यांना देखील असाच पवित्रा घ्यावा लागेल, मी सुद्धा शेतक-यांना कर्ज मुक्ती मिळावी यासाठी हे आंदोलन हाती घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. सरकार आणि मंत्री शेतक-यांचा विचार करणार नसतील तर शेतक-यांनी कोणत्याही पक्षाचा किंवा सत्ताधारी, विरोधक याचा विचार न करता आपल्या मुला बाळांचे, कुटुंबाचे आणि शेतीचे हित बघून यापुढे पाऊले टाकावीत.
यातच सगळ्यांचे भले आहे, कर्ज मुक्ती देणार नाही म्हणणा-या सरकारमधील मंत्र्यांना आतापासूनच गावबंदी करा. एकजुटीची वज्रमूठ आवळली तर शेतक-यांना न्याय मिळण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. शेतक-यांनी आता परिवर्तनाचा विचार करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत या लढ्यात आपण शेतक-यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.