लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतक-यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दो-याअंतर्गत प्रक्षेत्र भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतक-यांना इतर राज्यातील शेती उद्योगाची माहिती व्हावी, यासाठी अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक शेतक-यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे. शेतक-यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या माध्यमातून शेतक-यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे हा राज्याबाहेरील अभ्यास दौ-याचा उद्देश आहे.
अभ्यास दौरा राबवताना भेटीच्या ठिकाणांमध्ये परराज्यातील कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणा-या खाजगी कंपन्या, संस्था कृषी विज्ञान केंद्र, फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. अभ्यास दौ-याचा कालावधी हा जास्तीत जास्त ७ दिवसांचा राहील. यामध्ये प्रवास खर्च निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण साहित्य इत्यादी बाबींचा समावेश राहील. प्रति लाभार्थी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लागणारा खर्च लाभार्थ्याला स्वत: करावा लागेल. या अभ्यास दौ-याअंतर्गत महिला किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटातील सदस्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. अभ्यास दौ-यासाठी फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणा-या, शेडनेट गृह व हरितगृह उभारणी, फळ प्रक्रिया इत्यादीबाबत इच्छुक असणा-या शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी लाडके यांनी केले आहे.