मुंबई : शेतक-यांना कुठेही वा-यावर सोडणार नाही. सरकार शेतक-यांच्या पाठीशी उभे राहणार आहे, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच अवकाळी पावसाच्या नुकसानी संदर्भात सर्व जिल्हाधिका-यांना सूचना केल्या असल्याची माहिती खुद्द शिंदे यांनी दिली आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतक-यांच्या नुकसानावर भाष्य करत शेतक-यांना वा-यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तसेच आम्ही निवडणुकीत जे वचननामा दिला, त्यानुसार टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. लाडकी बहीण योजनेसह विकासकामे आपण करत आहोत, असे शिंदे म्हणाले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, प्रिंटिंग मिस्टेक करणारे हे सरकार नाही. आम्ही जे बोलतो, ते करतो. सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. सगळ्या योजना सुरू ठेवत असताना सरकार शेतक-यांच्या पाठीशी उभे आहे. सरकारला काटकसर करावी लागली. या बजेटमध्ये काही खात्यांना निधी कमी मिळाला. मात्र, पुढच्या जुलै पुरवणी बजेटमध्ये भरून काढू. कुठल्याही खात्यावर अन्याय करण्याची भावना सरकारची नाही, असे ते म्हणाले.
बोगस बियाण्यांवर कारवाई : मंत्री शिरसाट
मंत्री संजय शिरसाट यांनी बोगस बियाण्यांवर धाडी टाकून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून बोगस बी-बियाणे शहरात येते. त्यावर धाडसत्र दाखवले जाते. मात्र, अपेक्षित म्हणावी तशी कारवाई होत नाही. जे पेरतात त्यांचे होणारे नुकसान होते. त्याची वसुली झाली पाहिजे, असा नियम आहे. त्याचे पालन होत नाही. तसेच, बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई झालेली दिसत नाही. त्यासंदर्भात प्रशासनाला सक्त सूचना दिल्या. स्कॉड निर्माण करून धाडी टाकण्यास सुरवात करण्याचे सांगितले आहे असे संजय शिरसाट म्हणाले.