लखनौ : उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये शुक्रवारी एक भीषण अपघात झाला. लखनौ आग्रा एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला, जिथे लखनौहून आर्ग्याला जाणा-या प्रवाशांनी भरलेली खासगी बस टँकरला धडकली. टँकर आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
बस आणि टँकरच्या धडकेत जखमी झालेल्या प्रवाशांना सैफई वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. किरकोळ जखमी प्रवाशांवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याने भरलेला टँकर झाडांना पाणी देण्यासाठी चुकीच्या बाजूने जात असताना हा अपघात झाला.
या घटनेबाबत कन्नौजचे एसपी अमित कुमार म्हणाले, आज लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बस आणि पाण्याच्या टँकरमध्ये टक्कर झाली. बस लखनौहून दिल्लीच्या दिशेने जात होती. माहिती मिळताच पोलिस पोहोचले. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून १४ जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर ही माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.