21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयबुलंदशहरमध्ये भीषण अपघात, आठ ठार

बुलंदशहरमध्ये भीषण अपघात, आठ ठार

बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधील शिकारपूर-बुलंदशहर मार्गावर मॅक्स पिकअप आणि खासगी बसमध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला तर २१ जण जखमी झाले. मरण पावलेले सर्वजण अलिगड जिल्ह्यातील अत्रौली तालुक्यातील रायपूर खास अहिर नागला या गावातील रहिवासी होते. जखमींना जिल्हा रुग्णालयातील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिगढ जिल्ह्यातील अत्रौली तहसीलमधील रायपूर खास अहिर नागला गावातील ४० हून अधिक लोक गाझियाबादहून अलीगढला जात होते. हे लोक गाझियाबादच्या बुलंदशहर रोड बी-१० येथे असलेल्या ब्रिटानिया डेल्टा फूड कंपनीत काम करायचे. आज सकाळी गाझियाबादहून मॅक्स पिकअप कारमधून सर्वजण आपापल्या घराकडे निघाले. तेव्हा सलेमपूर पोलीस ठाणे हद्दीत समोरून येणा-या खासगी बसने पिकअपला धडक दिली.या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासोबतच २१ जण जखमी झाले आहेत.

मृत आणि जखमी सर्व पिकअपमध्ये होते. माहिती मिळताच शासकीय रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.जिल्हा दंडाधिकारी चंद्रप्रकाश सिंह आणि एसएसपी श्लोक कुमार यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन स्थितीत पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली आणि डॉक्टरांना उपचाराच्या सूचना दिल्या. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR