24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशात भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशात भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू

राजगढ : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील पिपलोडी गावात रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नावरून परतणा-या व-हाडाच्या वाहनाचा अपघात होऊन १५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातांवर राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.

राजगडचे जिल्हा दंडाधिकारी हर्ष दीक्षित यांनी या अपघाताविषयी माहिती दिली. जखमींपैकी १३ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींना ६ ते ७ रुग्णवाहिकांच्या मदतीने राजगडच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्याचवेळी डोक्याला आणि छातीला दुखापत झाल्याने दोघांना उत्तम उपचारासाठी भोपाळला पाठवण्यात आले आहे.

काल रात्री या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली होती. रात्री उशिरा हा आकडा १५ वर पोहोचला. तथापि, जिल्हा दंडाधिकारी हर्ष दीक्षित यांनी सांगितले की, ‘दोन गंभीर जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाही.’ राजस्थानमधील मोतीपुरा गावातून लग्नाचे व-हाडआले होते अन् ते कुलमपूरला जात होते. त्याच वेळी हा अपघात झाला.

राजस्थानमधील इकलेराजवळील मोतीपुरा गावातील तातूडिया कुटुंबाचे व-हाड ट्रॅक्टरमधून राजगढजवळील देहरिनाथ पंचायतीच्या कमलपूर गावात येत होते. खामखेडा पासून काही अंतरावर असलेल्या पिपलोडी वळणावर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पडला.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पोस्ट करून लिहिले, राजगढ जिल्ह्यातील पिपलोडी रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील १३ लोकांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. जिल्हाधिकारी आणि एसपी राजगड घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही घटनास्थळी आहोत. राजस्थान सरकारशी संपर्क साधला आहे मी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.

राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही राजगडमधील भीषण रस्ता अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली. राष्ट्रपती भवनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली आहे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्याची इच्छा करते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR