धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील एका तरूणावर चौघांनी जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याच्या कानशिलाला पिस्तुल लावली. ही घटना दि. १६ डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास तुळजापूर शहरातील हडको येथील हंगरगेकर शाळेच्या शेजारील मैदानात घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे दि. २० डिसेंबर रोजी चौघांच्या विरोधात अॅट्रासिटी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील गणेश रोचकरी, लखन भोसले, विश्वजीत अमृतराव, सुशांत सपाटे या चौघांनी हाडको येथील हंगरगेकर शाळेच्या शेजारील मैदानात फिर्यादी गोरख भागवत पारधे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी तु आमच्या समोर पांढरे कपडे घालून फिरतो का, असे म्हणून दहशत निर्माण केली. जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, बियरच्या बाटलीने मारहण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे समोर पिस्तुलच्या वरचा भाग खालीवर करुन कॉक करुन फिर्यादीच्या कानसिलावर लावली.
जातीवाचक शिवीगाळ करुन फिर्यादीच्या तोंडावर लघुशंका केली. सुपारी खावून तोंडावर थुंकली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गोरख पारधे यांनी दि.२० डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.