बोरी : जिंतूरहून परभणीकडे जाणा-या एस. टी. महामंडळाच्या बसने दुचाकीला उडवल्याची घटना शनिवार दि. ६ जून रोजी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास कोक जवळील पिंपरी फाट्याजवळ घडली. या भीषण अपघातात दुचाकीवरील ३ जण जागीच ठार झाले. ठार झालेल्या व्यक्तींमध्ये आजी, आजोबा व नातवाचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी बसखाली अडकून चेंदामेंदा झाली होती. या अपघातानंतर बस चालक फरार झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील आजी, आजोबा नातवासह दुचाकी (क्रमांक एम.एच. ३८ के ६६८२) वरून कौडगाव येथून जिंतूरकडे जात होते. याचवेळी एस. टी. महामंडळाची जिंतूर आगाराची बस क्रमांक (एम.एच. १३ सीयू ७८३३) जिंतूरहून परभणीकडे जात होती. कोक गावाजवळ पिंपरी फाटा येथे दुचाकी महामार्गावर येताच बसने जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील भगवान बळीराम काळे (५८), सुशीला भगवान काळे (५२), कन्हैया गजानन काळे (१२) सर्व राहणार शेवडी हे ३ जण जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती कोक येथील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच बोरीचे सपोनी. रामेश्वर धोंडगे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या दोन्ही बाजुंनी रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त बस व दुचाकीला घटनास्थळावरून हलवून वाहतूक सुरळीत केली.
















