मुंबई : देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर जगभरातून प्रवासी येतात. त्यामुळे, येथील विमानतळावर मोठी सुरक्षा तैनात केलेली असते. याशिवाय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानेदेखील विमानतळावरील सुरक्षेचा नेहमीच आढावा घेतला जातो. येथे अनेकदा सोने किंवा ड्रग्ससारख्या पदार्थांची तस्करी केली जाते. आता, चक्क खजुराच्या पॅकेटमधून कोकेनची तस्करी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. विमानतळ सुरक्षा रक्षकांनी खजुर पॅकेटमधून तब्बल २ किलो १७८ ग्रॅम कोकेन जप्त केले असून त्याची बाजारभावाप्रमाणे सध्याची किंमत तब्बल २१.७८ कोटी रुपये एवढी आहे.
खजुरातून कोकेनची तस्करी करण्यात आल्याचे समोर आले आहे. खजुराच्या पॅकेटमधून खजुर बाहेर काढत त्या खजुरातील बिया काढून त्यात कोकेन भरुन तस्करी करण्याचा प्रयत्न आरोपींचा होता. मात्र, मुंबई विमानतळावर हा डाव उघडकीस आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल २१.७८ कोटींचे कोकेन जप्त करण्यात आल्याने विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची ही (डीआरआय) मोठी कारवाई असून तब्बल २ किलो १७८ ग्रॅम कोकेन सुरक्षा यंत्रणांनी जप्त केले आहे. सिएरा लिओनवरून आलेल्या प्रवाशासह कोकेनची डिलिव्हरी घ्यायला आलेल्या इसमाला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तपासणीत जप्त करण्यात आलेली पावडर कोकेन असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तसेच, याप्रकरणी संबंधित कोकेन कुठून आणले होते, कुठे नेण्यात येणार होते. याशिवाय भारतात या तस्करीचा कुठे संबंध आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.